Saru Hospital

Home हर्निया

नाशिकमध्ये लेप्रोस्कोपिक हर्निया उपचार

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ‘हर्निया’ हा शब्द ऐकला असेल. पोटाशी संबंधित काहीतरी गूढ आजार असावा अशीच ब-याच जणांची समजूत असते. परंतु नावाप्रमाणे हा आजार गूढ नसून समजण्यास किती सोपा होऊ शकतो याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

नवजात अर्भकापासून म्हाताऱ्या पुरुष अथवा स्त्रीयांना होणारा ‘हर्निया’ म्हणजे नक्की काय त्रास आहे, याची सहसा लोकांना कल्पना नसते. तसेच सुरुवातीच्या काळात हर्निया वेदनारहित असल्याने बऱ्याच रूग्णांना आपल्याला हर्निया झाला आहे याची जाणीव त्याच्यातील गुंतागुंतीनंतरच होते.

 

हर्निया म्हणजे काय ?

जेव्हा आपल्या शरीरातील एखाद्या अवयवाचा काही भाग त्याची नेहमीची जागा सोडून बाहेर सरकतो तेव्हा त्याला हर्निया म्हणतात.

परंतु या व्याख्येवरून हर्निया म्हणजे नक्की काय याचे नेमके उत्तर मिळणे अवघड आहे, म्हणूनच आपण हर्नियाच्या निरनिराळ्या प्रकारांची सविस्तर माहिती पाहूया.

 

हर्निया होण्याची कारणे ?

खालीलपैकी एक अथवा जास्त कारणांमुळे हर्निया होतो.

  • जन्मत: शरीररचनेतील दोष
  • पोटातील दाब वारंवार वाढल्यास. उदा. लघवीस/शौचास वारंवार कुंथणे, दीर्घकालीन खोकला इ.
  • पोटाच्या स्नायूंना शिथिलता आल्यास उदा. लठ्ठपणा, वृध्दत्व, जलोदर, वारंवार गर्भारपण इ.
  • पोटाला इजा झाल्यास उदा. अपघात, शस्त्रक्रिया इ.

 

हर्नियाच्या फुगवट्याच्या आत काय असते?

हर्नियाचा फुगवटा अनेक पदरांनी बनलेला असतो. उदरपोकळीतील चरबीयुक्त पडद्यापासून पिशवी तयार होते व स्नायू, चरबी व कातडी यांची आवरणे तयार होतात. या पिशवीच्या आत आतडे किंवा इतर अवयव असतात.

सामान्यत: हर्नियामध्ये प्रथम चरबीचा पदर व त्यानंतर लहान आतडे हे अवयव येतात. क्वचित प्रसंगी हर्नियामध्ये पोटातील इतर अवयवही येतात. उदा. मोठे आतडे, अपेंडिक्स, मुत्राशय इ.

 

हर्नियाचे निदान कसे करतात ?

रुग्णास उभे करुन खोकण्यास सांगितले असता हर्नियाचा फुगवटा दिसतो. पोटावरील त्याच्या जागेवरुन त्याचे निरनिराळे प्रकारही लगेच समजून येतात.

हर्नियाच्या लक्षणावरुन आजाराची अवस्थाही समजते. निदानासाठी पॅथॉलॉजिकल टेस्ट किंवा एक्स-रे ची जरुरी नसते. मात्र पोटाची सोनोग्राफी तपासणी करणे आवश्यक ठरते.

 

हर्नियासाठी काही औषधोपचार आहेत का?

हर्निया हा रोग नसून, एखाद्या ठिकाणापुरता कमकुवतपणा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या औषधाने हर्निया बरा होऊ शकत नाही. यासाठी शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे.