मधुमेह पाय व्यवस्थापन

Home मधुमेह पाय व्यवस्थापन

मी पायाची काळजी कशी घ्यायची?
पाय सांभाळणे, त्यांच्याकडे नियमित लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे. तुम्हाला मधुमेह असेल तर प्रथम तुमच्या डॉक्टरकडून पायाची तपासणी करून घ्या. दोन छोटीशी आयुधे वापरून तुमचे पाय ते तपासतील. त्यावरून तुमच्या पायाच्या संवेदना ठरवतील. चालताना तुमच्या पोटऱ्यांमध्ये गोळे येताहेत का ते विचारतील. मग तुमच्या पायांचा रक्तपुरवठा व्यवस्थित आहे की नाही याची पाहणी करतील. पायाच्या त्वचेला भेगा पडल्यात का, नखांची स्थिती काय आहे, कुठे भोवरी आलीय का याचा धांडोळा घेतील. त्यावरून तुमच्या पायाला धोका आहे का ते ठरेल.
तुम्हीही पायाची काळजी घ्यायला शिकले पाहिजे. पायाची नखे कापताना ती बोटांलगोलग न कापता थोडे अंतर ठेवून कापली पाहिजेत. त्वचा कोरडी होत असेल तर त्यावर त्वचा मुलायम करणारी औषधे किंवा तेल चोपडले पाहिजे. पायाला भोवरी असेल तर ती काढून घेतली पाहिजे.
स्लीपर किंवा अर्धा अधिक पाय उघडा ठेवणाऱ्या चपला वापरण्याऐवजी बूट वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बूट अरुंद, पायात घट्ट बसणारे नसावेत. बूट पायात चढवल्यावर तुमची बोटे त्यात सहजपणे हलवता आली पाहिजेत. संध्याकाळी पायाचा आकार अल्पसा मोठा होतो हे लक्षात ठेवून बुटांची खरेदी संध्याकाळी सात-आठ वाजता केली पाहिजे.
पायाच्या संवेदना कमी झाल्या तर नियमितपणे पाय तपासायला हवेत. पायाची खालची बाजू आपल्याला नीट दिसत नाही म्हणून प्रसंगी पायाखाली आरसा धरून हे केले पाहिजे. कुठे जखम आढळली तर ती गोष्ट त्वरित डॉक्टरांच्या नजरेस आणून दिली पाहिजे. अनवाणी चालणे टाळावे. प्रत्येक वेळी बूट चढवताना त्यात एखादी टोकदार, पायाला जखम करू शकेल अशी वस्तू नाही ना याची खात्री केली पाहिजे.

मधुमेहात डॉक्टर पाय सांभाळायला सांगतात. हे किती महत्त्वाचे आहे?
खरे आहे. मधुमेहात पाय किंवा पायाचा भाग कापला जाण्याचे प्रमाण बरेच जास्त असते, किंबहुना अपघात वेगळे काढले तर माणसे अपंग होतात ती मधुमेहात. म्हणून पाय सांभाळा, असे डॉक्टर रुग्णांना नेहमीच सांगत असतात.

पण हे असे का? जखम लवकर बऱ्या होत नाहीत का?

मधुमेहात सगळ्याच लोकांमध्ये जखमा बऱ्या होत नाहीत हे खरे नाही. त्यामुळे ज्यांच्या जखमा पटकन चांगल्या होतात, त्यांनी हुरळून जाण्याचे कारण नाही; पण काही लोकांमध्ये मात्र जखमा ठीक व्हायला खूपच वेळ लागतो. मधुमेहात पाय सांभाळताना तीन मुख्य गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. पायाला जखम होते, ती पाय सुन्न झाल्यावर. म्हणजे मज्जारज्जू निकामी होणे हा पहिला घटक. रुग्णाला जखम झालेली कळत नाही. दुखत नसल्याने रुग्ण त्या जखमेवरच चालत राहतात. जखम आणखी मोठी करतात. जोपर्यंत ती फार जडवत नाही, तोपर्यंत रुग्णाच्या ते लक्षात येत नाही. मधुमेहामुळे जंतुसंसर्ग लवकर होतो आणि तो जलद पसरतो. पाय हे तसे बरेच गुंतागुंतीचे प्रकरण आहे. ते अख्ख्या शरीराचे वजन तोलत असतात. पायाच्या एकंदर जडणघडणीत काही दोष झाला आणि वजन सर्वागीण न तोलले जाता कुठे कमी कुठे जास्त असा दाब पडायला लागला, की प्रश्न निर्माण होतो. पायाचा थोडा भाग जास्त, तर थोडा कमी घासला जातो. अशा असमान दाबाचा मधुमेहात पाय कापले जाण्याशी थेट संबंध असतो. हा दुसरा घटक. तिसरी गोष्ट म्हणजे मधुमेहात रक्तवाहिन्या मोठय़ा प्रमाणात बंद होतात. त्याने त्या भागाचा रक्तपुरवठा थांबतो आणि त्या पुढचा भाग मृत होतो. पाय हा शरीरातला सर्वात मोठय़ा लांबीचा अवयव असल्याने तिथल्या रक्तवाहिन्या बंद पडल्या, की पाय कापण्यावाचून गत्यंतर उरत नाही. बहुतेक वेळा या तीन घटकांपकी किमान दोन किंवा काही वेळेला तीनही घटक मिळून रुग्णाच्या पायाची वाट लावतात.